कत्तलीसाठी जाणारे २१ बैल, ५ टेम्पो जप्त
फुलंब्री (प्रतिनिधी): समृद्धी महामार्गावरील सावंगी इंटरचेंज येथे रविवारी (दि. १४) रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास फुलंब्री पोलिसांनी कारवाई केली. कत्तलीसाठी क्रूरपणे वाहतूक करण्यात येत असलेले २१ बैल व त्यासाठी वापरण्यात आलेली ५ टेम्पो वाहने पोलिसांनी जप्त केली आहेत.
सिन्नर, जिल्हा नाशिक येथून बैलांची अवैध वाहतूक होत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ कारवाई करत घटनास्थळी छापा टाकला. पाहणीअंती प्रत्येकी तीन ते चार बैल अशा दाटीवाटीने, आखूड दोरीच्या सहाय्याने बैलांना बांधून कत्तलीसाठी नेले जात असल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणी सुमारे १२ लाख रुपये किमतीची ५ टेम्पो वाहने व ६ लाख रुपये किमतीचे २१ बैल असा एकूण १८ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पो. कॉ. शेजूळ यांच्या तक्रारीवरून पोलीस ठाणे फुलंब्री येथे प्राणी छळ प्रतिबंधक अधिनियम तसेच प्राणी संरक्षण अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जप्त केलेले सर्व बैल चिकलठाणा गोशाळा येथे सुरक्षितपणे जमा करण्यात आले आहेत. संबंधित ५ टेम्पो वाहने फुलंब्री पोलीस ठाण्यात जप्त ठेवण्यात आली आहेत. पुढील तपास फुलंब्री पोलीस करीत आहेत.















